पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रायगडच्या जागेवर सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवण्यात आलं आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
दरम्यान, रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनील तटकरे यांना उमदेवारी देण्यात आली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत तटकरेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. त्याबाबतची माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच येत्या 28 तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर करण्यात येईल असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
नेमकं काय अजित पवार म्हणाले?
आज आमची आमदारांची बैठक झाली. आम्ही एकत्रित चर्चा करुन महायुतीच्या ४८ जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कुठे जागा लढवायच्या त्याचं ८० टक्के काम झालं असून ९९ टक्के जागावाटपाचं काम झाले आहे. आज मी पहिली जागा जाहीर करत आहे. रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
मुख्य पक्ष आणि घटक पक्ष मिळून ४८ जागा लढवत आहोत. शिवाजीराव अढळराव यांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे. तो प्रवेश झाल्यानंतर दुसरी जागा मी तिथे जाहीर करणार आहे. बाकी जागा २८ तारखेला मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार असून महायुतीच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होईल. असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.