पुणे : औरंगाबाद पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांना यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना आज (मंगळवारी) सकाळी एअर अॅम्बुलन्सने मुंबईला नेण्यात आले आहे. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भेटीसाठी लवकरच लिलावतीमध्ये दाखल होणार आहेत.
शिरसाठ यांना काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने आज सकाळी तातडीने उपचारांसाठी मुंबईला आणण्यात आले आहे. औरंगाबाद विमानतळावर संजय शिरसाट यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या 40 हून अधिक बंडखोर आमदारांमध्ये संजय शिरसाटही होते. यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत मिळत सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार केला, मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. संजय शिरसाट यांनीही ही नाराजी अनेक वेळा बोलून दाखवली, या नाराजीमुळे ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटात सामील होणार असल्याच्याही चर्चा रंगल्या.