बीड : स्वर्गीय विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी बीड लोकसभेची निवडणूक महाविकासआघाडीकडून लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. भाजपने पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेचे तिकीट जाहीर केल्यानंतर शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी आज एक महत्त्वाची बैठक घेतली.
या बैठकीत ज्योती मेटे यांनी शरद पवार गटाकडून लोकसभेची निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं आहे. विधानपरिषद निवडणुकीवेळी स्वर्गीय विनायक मेटे यांच्यावर अन्याय केल्याचा आरोपही कार्यकर्त्यांनी केला आहे.
ज्योती मेटे यांनी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी लोकांची आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे ज्योती मेटे यांनी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवावी यासाठी बीडमधील शिवसंग्राम भवन येथे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये ज्योती मेटे यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली पाहिजे असं एकमताने ठरविण्यात आले आहे. त्यामुळे आता ज्योती मेटे नेमका काय निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीत बीडची जागा शरद पवारांना सुटण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवेळी धनंजय मुंडे अजित पवारांच्या गटात सहभागी झाले आहेत. अशात धनंजय मुंडे यांची ताकद पंकजा मुंडे यांना मिळणार आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचे आव्हान पवारांसमोर आहे. त्यामुळे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना उमेदवारी देऊन बीडमध्ये शरद पवार डाव टाकणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.