इंदापूर, (पुणे) : पुण्यातील गॅंगवारच लोन आता पसरताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील पुणे-सोलापूर महामार्गाच्या बायपासवरील हॉटेल जगदंबा येथे आज संध्याकाळी पावणे आठच्या सुमारास गोळीबार करण्यात आला असून एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अविनाश धनवे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं आहे. दरम्यान, हा गोळीबार कोणी केला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकली नसून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. या गोळीबाराने इंदापूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, इंदापूरच्या बायपासवरील जगदंबा हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. दोन गटात पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती प्रथमदर्शनी दिली आहे. अविनाश धनवे हा त्याच्या मित्रांसह जगदंबा हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबला होता.
त्यावेळी दबा धरून बसलेल्या पाच ते सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. या घटनेत त्याच्या डोक्याला गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. अविनाश धनवे असं मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून पुण्यातील आळंदी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.