राहुलकुमार अवचट
यवत : पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांनी शिवलिंगाचे दर्शन घेतले. सायंकाळनंतरही दर्शनासाठी भाविकांचा ओघ चालूच असून, रात्री बारा वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी सुरुवात केली होती.
रात्रीपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शिवलिंगास अभिषेक करण्यात आला. यावेळी शिवलिंगास व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. पहाटे पाच वाजता महाआरती करण्यात आली. गर्भगृहात शिवलिंगावर चांदीचे आवरण असलेली पिंड यावर केलेली केलेली आकर्षक फुलांची सजावट , दगडी नंदी , आकर्षक विद्युत रोषणाई व परिसरात केलेले सजावटीने सर्वत्र मंगलमय वातावरण झाले होते.
प्राचीनकालीन श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात दरवर्षी लाखो भाविकांची गर्दी उसळत असून, यावर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे जितेंद्र भुरुक यांच्या महाशिवरात्र पहाट हा भक्ती गीतांचा कार्यक्रम झाला तर दिवसभर स्वरसाधना, नवखंडेनाथ बाल, समस्त ग्रामस्थ मंडळ माळशिरस यांच्या भजनाचे कार्यक्रम झाले. दिवसभर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी दर्शनासाठी हजेरी लावली.
दर्शनासाठी गर्दी होऊ नये म्हणुन मंदिराभोवती दर्शन रांग तयार करण्यात आली. माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली. जेजुरी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मंदिर परिसरात विविध व्यक्तींच्या व संस्थांच्यामार्फत फराळाचे वाटप करण्यात आले. दिवसभर भाविकांची संख्या वाढत गेली. यामुळे मंदिराभोवतीभली मोठी रांग लागली होती. दर्शनासाठी येणारी वाहने वन विभागातील कमानीबाहेर थांबविल्याने मंदिराभोवती वाहनांची कोंडी झाली नाही.
वन विभागाचे कमानीपासून मंदिरापर्यंत विविध प्रकारची दुकाने थाटली होती. अनुराज साखर कारखाना (बोरकर परिवार) यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. दिवसभर खिचडीचे अन्नदान करण्यात आले. हर हर महादेवच्या जयघोषाने भुलेश्वर मंदिर परिसर दणाणुन गेला होता.