पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. उमेदवार निवडीवरून धुमश्चक्री सुरू आहे. जागावाटपासाठीची रस्सीखेच सुरू आहे. पुण्यात बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकडे विशेषतः अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. शिरूरचा महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीकडून अभिनेते नाना पाटेकर यांना ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, नाना पाटेकर यांनी नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा आहे. या मतदारसंघामध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अशातच आता शिरूरमधून नाना पाटेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवाळीच्या काळात अजित पवार हे नाना पाटेकर यांच्या घरी गेले होते. त्यावेळी नाना पाटेकर यांनी राजकारणामध्ये येण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यामुळेच त्यांना ही ऑफर देण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अजित पवार यांनी नाना पाटेकर यांना ऑफर दिली, त्यावेळी ते महाविकास आघाडी सरकारमध्ये होते. आता ते महायुतीत सामील झाल्यामुळे समीकरणे बदलली आहेत. शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे हे तगडे उमेदवार मानले जात आहेत. त्यांना टक्कर देण्यासाठी तितक्याच ताकदीचा उमेदवार देण्याची गरज आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून नाना पाटेकर यांना उमेदवारी देण्याबद्दल विचारणा करण्यात आली आहे.
दरम्यान, नाना पाटेकर यांचा शिरूर मतदारसंघाशी फारसा संबंध नाही, त्यामुळे नाना हे या मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक नाहीत. त्यामुळेच नानांनी अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघातून लढण्यास नकार दर्शवला आहे.
याविषयी बोलताना नाना पाटेकर यांनी एका कार्यक्रमात स्पष्ट मत व्यक्त केले होते. त्याचीच चर्चा होत आहे. ‘मला राजकारणात जाता येत नाही कारण जे पोटात आहे तेच ओठात येतं. दुसऱ्या दिवशी मला त्या पक्षातून मला काढून टाकतील आणि महिन्याभराने सर्व पक्ष संपलेले असतील. मग कशाला जायचं तिथं?’ या विधानाची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे.