पुणे : पुण्यातील सोन्या मारुती चौकात सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या तीन महिलांनी सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सराफी पेढीचे मालक ओंकार वेर्णेकर (वय २३, रा. बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यांची सोन्या मारुती चौकात सराफी पेढी आहे. खरेदीच्या बहाण्याने तीन महिला त्यांच्या सराफी पेढीत शिरल्या.
कर्मचाऱ्याला दागिने दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून महिलांनी प्लास्टिक ट्रेमधील एक लाख १६ हजार ८०० रुपयांच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरून पळून गेल्या. बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वेर्णेकर यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
फरासखाना पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. दागिने चोरून पसार झालेल्या महिलांचा शोध सुरु आहे. सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.