पुणे : कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून नर जातीचा बिबट्या पळाल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी सकाळी ही घटना घडली. विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यातील बिबट्या पळाल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर आला होता. तो प्राणीसंग्रहालयाच्या आवारातच होता. तो कर्मचाऱ्यांना सापडला असून, त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कात्रज प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र, सोमवारी सकाळी सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्या पसार झाल्याचे संग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पिंजऱ्याच्या लोखंडी सळ्या वाकवून तो प्रसार झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळाली.
बिबट्या पळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांसाठी बंदी घालण्यात आली होती. सकाळपासून बिबट्याला शोधण्यासाठी प्राणी संग्रहालयात पथके तैनात करण्यात आली. मात्र रात्री उशिरापर्यंत बिबट्या कोठेही आढळून आला नव्हता. त्यामुळे आता प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाची झोप उडाली होती. मात्र, बिबट्या पिंजऱ्यातून बाहेर आला होता. तो प्राणीसंग्रहालयाच्या आवारातच होता. तो कर्मचाऱ्यांना सापडला असून, त्याला बेशुद्ध करून पिंजऱ्यात बंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
कात्रज येथील प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या प्राणिसंग्रहालयात पश्चिम घाटातील जैवविविधता दर्शविणारे सस्तन प्राणी, पक्षी आणि सरपटणारे प्राणी अशा एकूण ६६ जातींचे प्राणी आहेत. प्राणिसंग्रहालयातील खंदक हे मोठे आणि नैसर्गिक आभासाचे आहेत. सध्या असलेल्या प्राण्यांमध्ये आशियाई सिंह, जंगली मांजर, लेपर्ड कट, जाएंट स्क्विरल, पिसोरी हरीण, खोकड, जंगली कुत्रे, तरस, लायन टेल मकाक या प्राण्यांचा समावेश आहे. तसेच याशिवाय वाघ, हत्ती, गवा, अस्वल, लांडगा, कोल्हा, शेकरू आदी प्राणीही येथे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यामध्ये चौशिंगे, तरस आणि बिबट्या या प्राण्यांची भर पडली होती.
या प्राणिसंग्रहालयात चार बिबटे असून, त्यातील तीन मादी आहेत. यातील नर जातीचा बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाल्याचे सोमवारी पुढे आले. या बिबट्याला विलगीकरण कक्षातील पिंजऱ्यात ठेवले होते. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मात्र बिबट्या पसार झाला नसल्याचे सांगितले.