शिरूर : अजित पवार यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर गंभीर आरोप करत टीका केली. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. अमोल कोल्हे हे सेलिब्रिटी उमेदवार असून त्यांना उमेदवारी देऊन मी चूक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्या टीकेला आता अमोल कोल्हे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मी त्यांच्या पक्षात यावं यासाठी अजित पवारांनी माझी लपून-छपून भेट घेतली आणि १०-१० वेळा निरोपही पाठवले, असा गौप्यस्फोट अमोल कोल्हे यांनी केला आहे.
अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे हेदेखील संसद सदस्य आहेत. मात्र माझी लोकसभेतील कामगिरी त्यांच्यापेक्षा उजवी आहे. मी २०१९ साली काढलेल्या शिवस्वराज्य यात्रेचं अजित पवार यांनी स्वत:च कौतुक केलं होतं. मी सेलिब्रिटी उमेदवार असेन आणि मतदारसंघात काम केलं नसेल तर अजित पवार यांनी मी त्यांच्या पक्षात यावं, यासाठी माझ्या गुप्त भेटी का घेतल्या आणि १० वेळा निरोप का पाठवले? असा खोचक सवाल विचारत अमोल कोल्हे यांनी पलटवार केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, मला शरद पवारसाहेबांनी जी संधी दिली, त्या संधीप्रती प्रामाणिक राहण्याचा मी प्रयत्न केला आहे. माझी संसदेतील जी कामगिरी आहे, ती मी लोकांसमोर मांडली आहे. मी ठामपणे सांगतो, जी भूमिका मी घेतली, त्या भूमिकेवर मी कायम आहे आणि कायम राहणार आहे, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे.