केडगाव: संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असताना संपूर्ण राज्याचं लक्ष मात्र बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघ हा भाजपने मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये टाकला असल्याने येथे सुप्रिया सुळे यांना महायुतीच्या सुनेत्रा पवार यांचं मोठं आव्हान असणार आहे. या दोघांच्या भांडणात आता तिसऱ्या मोठ्या शक्तीने शिरकाव केला आहे. ही शक्ती आहे माळी, धनगर आणि इतर ओबीसी बांधव मिळून बनलेल्या ‘ओबीसी पर्व’ एकतेची. ओबीसी पर्वातर्फे विविध नावांची चाचपणी सुरु असताना यात प्रामुख्याने महेश भागवत यांचे नाव पुढे येत आहे. या पर्वात फक्त ओबीसी बांधव सामील न होता इतरही जाती, धर्माचे लोक प्रस्थापितांच्या विरोधात एकवटत असल्याने वर्षानुवर्षे सत्ता मुठीत ठेवणाऱ्या प्रस्थापितांना मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर असा सामना रंगला होता. यामध्ये सुप्रिया सुळे यांना ५,२१,५६२ तर महादेव जानकर यांना ४,५१,८४३ इतकी मते पडली होती. या निवडणुकीत सुरेश खोपडे यांना २६,३९६, तात्यासाहेब टेळे ८,८११ आणि नोटा ला १४,२१६ इतकी मते मिळाली होती. या निवडणुकीत महादेव जानकर यांचा अवघ्या ६९,७१९ मतांनी पराभव झाला होता. वरील आकडेवारी पाहता त्यावेळी ओबीसी फॅक्टर हा कार्यान्वित नव्हता आणि बहुसंख्य समाजाचा कल हा राष्ट्रवादीच्या बाजूने राहिला होता. यावेळी मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे सुळे, पवार यांच्यासमोर ओबीसी पर्वाचे मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे दिसत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येत असून त्यामध्ये दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. सध्या सुरु झालेल्या ओबीसी पर्वाच्या बैठकांमध्ये अनेक सर्वसामान्य लोक आपले विचार मांडत असून सुळे, पवार यांच्यात जिंकून कुणीही आले, तरी सत्ता मात्र पुन्हा एकदा एकाच घरात राहणार ना? असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यामुळे प्रस्थापितांना शह देण्यासाठी आता ओबीसी पर्व कंबर कसत असल्याचे दिसत आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतपासून सुरु झालेला ओबीसी फॅक्टर हा संपूर्ण राज्यात पोहोचला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये आणि वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओबीसी पर्वाची स्तुती केली होती. हाच ओबीसी फॅक्टर आत्ताच्या लोकसभेला मोठे आव्हान उभे करू शकतो हे आकडेवारीतून स्पष्ट होताना दिसत आहे.
संपूर्ण देश ओबीसीमय झाला असून आता आपल्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणात जागृत झाला आहे. शेवटी ‘जो ओबीसी के हीत की बात करेगा वही देश पे राज करेगा ‘हे महत्त्वाचे आहे. समाजाच्या प्रगतीसाठी संवैधानिक अधिकार मिळवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या उमेदवारास निवडून दिल्यास समाजाला न्याय मिळेल .
– महेश भागवत