Jharkhand News : परदेशातून भारतात फिरायला आलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिला ही तिच्या पतीसोबत झारखंड येथील दुमका येथे आली होती. त्याठिकाणी आठ ते दहा जणांनी तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे. दरम्यान, पीडितेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हंसडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुरुमाहाट येथे शुक्रवारी रात्री उशिरा ही घटना घडली. स्पेनमधील महिला या ठिकाणी फिरायला आली होती. स्पेनमधून पती-पत्नी टुरिस्ट व्हिसावर भारतात आले होते. ते आधी स्पेनमधून पाकिस्तानला गेले होते. तिथून ते बांगलादेश आणि त्यानंतर तिथून भारतातील झारखंडच्या दुमका येथे आले होते. दुमकाच्या हंसडीहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुंजी गावात ते टेंटमध्ये थांबले होते. झारखंडमधून ते दोघे नेपाळला जाणार होते. त्याआधीच आठ ते दहा जणांनी महिलेवर बलात्कार केला.
या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पीडितेच्या तक्रारीवर घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. पीडितेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.