कल्याण : गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. सुषमा अंधारे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पडत्या काळात पक्षप्रवेश केल्यापासून त्यांचं शिवसेना ठाकरे गटातील महत्व दिवसागणिक वाढत गेलं आहे. अशातच आता ठाकरे गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुषमा अंधारे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी माझं नाव चर्चेत आहे पण मला त्याबाबत अधिकृत निरोप आलेला नाही, मला फक्त काम करायच आहे. पक्षाने मला सांगितलं तर मी वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात लढेन असं सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
पुढे बोलताना म्हणाल्या, श्रीकांत शिंदे म्हणजे फार मोठा अडचणीचा डोंगर असं वाटत नाही. त्यांच्याशी समोरं जाताना फार मोठं आव्हान आहे असं वाटत नसल्याचंही त्या म्हणाल्या आहेत. मुक्तसंवाद अभियानांतर्गत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचा आज कल्याण दौरा होता. या दौरादरम्यान त्यांनी अग्रवाल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यानंतर त्यांनी कोळशेवाडी शहर शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.