मुंबई : मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. सलाईनमधून विष देण्याचा डाव आहे. म्हणूनच सलाईन घेणे बंद केले असा आरोप करत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. सागर बंगल्यावर येतो मारून दाखवा असं आव्हानही मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिले. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ज्या माणसामुळे कोर्टात आरक्षण टिकले त्याच्याबद्दल असे वक्तव्य खपवून घेणार नाही, असे अजित पवारांनी म्हटले आहे.
कुणीही मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना काहीही बोललं तर ते खपवून घेतलं जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरांगेंना दिला आहे. तर जरांगेंच्या आंदोलनामागे कोण, हेही शोधणार असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
जरांगे सगेसोयरेंच्या अंमलबजावणीसाठी ठाम
मनोज जरांगे सगेसोयरेंच्या अंमलबजावणीसाठी ठाम आहेत. उद्यापासून रोज सकाळी 10.30 ते 1 वाजेपर्यंतच रास्तारोको करा आणि त्याचं रेकॉर्डिंग करून ठेवा असे आवाहन मनोज जरांगेंनी मराठा समाजाला केले आहे. बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होईल असा प्रकार करू नका, असेही जरांगेंनी म्हटले आहे.
जरागेंचे फडणवीसांवर आरोप कोणते?
पाच महिने झाले तरी देवेंद्र फडणवीस गुन्हे मागे घेत नाही. तुम्हाला बळी पाहिजे तर मी माझा बळी देण्यास तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मला मारण्याचा कट आहे. सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे मी सलाईन घेणेच बंद केले आहे. नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.