लखनऊ: काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशातील पेपर लीकच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी ट्विट केले आहे. राहुल गांधींनी एक व्हिडिओ ट्विट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “लखनऊपासून प्रयागराजपर्यंत पोलिस भरती पेपर लीकवरून तरुण रस्त्यावर उतरले आहेत आणि तेथून फक्त 100 किलोमीटर अंतरावर वाराणसीमध्ये पंतप्रधान तरुणांच्या नावावर तरुणांना फसवत आहेत. याच ट्विटमध्ये राहुल गांधी पुढे म्हणाले, “थेट वाराणसीच्याच अंदाजात सांगायचे तर, ‘मोदी जी नानी को ननिहाल का हाल सुना रहे हैं.”
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला होता
पंतप्रधान मोदींनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राहुल गांधींवर निशाणा साधला. त्यांनी आरोप केला की, “काँग्रेसचा युवराज काशीच्या भूमीवर आला आहे आणि त्यांनी इथल्या तरुणांना अंमली पदार्थांचे व्यसनी म्हटले आहे. मोदींना शिव्या देताना ते आता संवेदना गमावलेल्या काशीतील तरुणांवर आपला राग काढत आहेत.
पीएम मोदी म्हणाले होते की, “अहो अतिपरिवारवादी, काशीचे तरुण उत्तर प्रदेशच्या विकासात गुंतले आहेत, त्याचे समृद्ध भविष्य लिहिण्यासाठी कठोर परिश्रम करत आहोत. कुटुंबवाद्यांना नेहमीच युवा शक्तीची भीती वाटते. ते तरुणांच्या प्रतिभांना घाबरतात. एखाद्या सामान्य तरुणाला संधी मिळाली तर तो सर्वत्र आव्हान देईल, असे वाटते. त्यांना फक्त तेच लोक आवडतात जे रात्रंदिवस त्यांचा जयजयकार करतात.”
काशीबाबत राहुल गांधींचे वक्तव्य
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी चंदौली, वाराणसी आणि अमेठीमार्गे रायबरेलीला पोहोचली. यावेळी राहुल गांधी म्हणाले होते की, “मी वाराणसीमध्ये पाहिलं की हजारो तरुण दारू पिऊन रस्त्यावर पडून आहेत.” आरओ-एआरओ भरती परीक्षेत हेराफेरी आणि पेपर लीक प्रकरणाबाबत उत्तर प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये उमेदवार निदर्शने करत आहेत. यावरून काँग्रेस योगी सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहे.