पिंपरी, (पुणे) : पुण्यातील आळंदी परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरावर सशस्त्र दरोडा टाकत दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवनू ९८ हजार रुपये किमतीचे सोने आणि रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गुरुवारी २२ फेब्रुवारीला पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या कालावधीत चऱ्होली खुर्दमधील वडगाव रोडवरील सुरेशनगर येथे घडला आहे. याप्रकरणी रमेश विठ्ठल थोरवे (वय ४३. रा. चऱ्होली खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून आळंदी पोलिस ठाण्यात ५ दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, थोरवे चऱ्होली खुर्दमधील वडगाव रोडवरील वस्तीवर हे दाम्पत्य राहतात. या परिसरात लोकवस्ती विरळ आहे. घरात थोरवे आणि त्यांची पत्नी असे दोघेच राहतात. गुरुवारी पहाटे अडीच ते तीनच्या दरम्यान ५ दरोडेखोर स्कॉर्पिओ (क्रमांक एमएच ४३ बीजे ५५९६) मोटारीमधून आले. त्यांनी थोरवे यांच्या घराचा दरवाजा लाथा मारून तोडून घरामध्ये जबरदस्तीने घुसत थोरवे आणि त्यांच्या पत्नीच्या गळ्यावर कोयता व विळा ठेवून धाक दाखवत ९७ हजार रुपये किमतीचे १९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पाच दरोडेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.