मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या भांडुपमधील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बाळ सारखं रडतं म्हणून ३ नर्सेसने दहा ते बारा दिवसांच्या नवजात मुलाच्या तोंडात चुपणी कोंबून वर चिकटपट्टी लावल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार उघडकीस येताच या प्रसूतिगृहातील तीन नर्सविरोधात भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमक प्रकरण काय?
बदलापूर येथे राहणाऱ्या प्रिया कांबळे यांची २० मे २०२३ रोजी या प्रसूतिगृहात प्रसूती झाली होती. बाळ सुदृढ असल्याने काही दिवसांनी त्या दोघांना रुग्णालयातून सोडण्यात आले होतं. मात्र बाळाचे बारसे केल्यानंतर काही दिवसांनी त्याचा त्वचा पिवळसर झाल्याने बाळाला ३१ मे २०२३ रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. १२ दिवसांच्या या बाळाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं.
बाळाला दूध पाजण्यासाठी त्याची आई अतिदक्षता विभागात गेली असता तिला बाळाच्या तोंडात चुपणी आणि त्यावर चिकटपट्टी लावल्याचे निदर्शनास आले. बाळाच्या हनुवटीला, मानेला चिकटपट्टी लावल्याचं दिसून आलं. प्रिया यांनी सर्व चिकटपट्टी काढली. या चिकटपट्टीमुळे बाळाला पुरळ देखील उठले होते.
याबाबत प्रिया यांनी तेथील नर्सेसना जाब विचारला. त्यावेळी बाळ रडत असल्याने चिकटपट्टी लावाली लागते, यात काही नवीन नाही. उगाच गोंधळ घालू नका असं नर्सने सांगितलं. या घटनेनंतर कांबळे यांनी तातडीने रुग्णायातून बाळाला डिस्चार्ज देण्याची मागणी केली. प्रिया यांच्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नगरसेवकाने देखील रुग्णालय प्रशासनाला याबाबत जाव विचारला.
काही महिन्यांनी वकील तुषार भोसले यांनी याबाबत मराराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाकडे याबाबत तक्रार केली. त्यानंतर मानली हक्क आयोगाने मुंबई महापालिका आणि पोलिसांना याबाबत समन्स पाठवलं. याबाबत तक्रार केल्यानंतर तीन नर्सविरुद्ध भांडुप पोलिस ठाण्यात अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.