मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुरू असलेल्या जागावाटपाच्या मुद्द्यावर दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामुळे जागावाटपाचा प्रश्न लवकरच मार्गी लागणायची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील 48 पैकी 39 जागांवर एकमत झाले आहे. 9 जागांची अडचण आहे. जो पक्ष बलाढ्य असेल त्याने त्या जागेवर निवडणूक लढवावी, यावर एकमत झाले आहे. इंडिया आघाडीत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबतही चर्चा झाली आहे. 27-28 फेब्रुवारी रोजी जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
महाराष्ट्रात जागावाटपावर एकमत होणे सोपे नाही
खरे तर लोकसभा निवडणुकीबाबत महाराष्ट्रात जागावाटप हे मोठे आव्हान आहे. येथे महाविकास आघाडी अर्थात काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटात आधीच युती आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांपैकी कोणाला किती जागा मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे आघाडीत समाविष्ट असलेल्या पक्षांच्या नेत्यांशी सातत्याने चर्चा करत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्याशी युती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी आता महाराष्ट्रात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यात व्यस्त आहेत.
शरद पवारांना या पक्षांना सोबत घ्यायचे आहे
महाराष्ट्रात जागावाटपाबाबत राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या मित्रपक्ष उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्यात जागावाटपाच्या सूत्रावर एकमत होण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न केले जात आहेत.
शेतकरी कामगार पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांसारख्या छोट्या पक्षांना इंडिया आघाडीत सामावून घेण्यास शरद पवार अनुकूल असल्याचे समोर आले आहे. या पक्षांची राज्यात चांगली पकड असल्याचे पवार सांगतात. गुरुवारीही शरद पवार यांनी राहुल गांधींशी चर्चा केली तेव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एकत्रित रॅली काढता याव्यात यासाठी जागावाटप लवकरात लवकर अंतिम करण्यास सांगितल्याचे वृत्त आहे.