जालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सगेसोयऱ्यांचे आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. जरांगे पाटील यांनी राज्यभरात मराठा समाजाला रास्ता रोको करण्याचे आवाहन केले आहे. हो आंदोलन २ भागांत होणार आहे. सकाळी सकाळी 10.30 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 पर्यत आंदोलन करण्यास त्यांनी सांगितलं आहे.
त्याशिवाय, २९ फेब्रुवारीपर्यंत आरक्षण दिले नाही तर मराठा समाजातील वृद्धांनी आमरण उपोषणाला बसावे. यापैकी एकही व्यक्ती मेली तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची असेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
नेमकं काय म्हणाले?
“राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करा. सकाळी 10.30 वाजता आंदोलन सुरु करा. पोलिसांनी परवानगी दिली, नाही दिली तरी आंदोलन करा. पण यावेळी जाळपोळ करू नका. शहरातील नागरिकांनी शहरात आणि गावातील गावागावातील रस्ते आडवा. लोकांनी सकाळी 10.30 ते 1 आणि ज्यांना जमलं नाही त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 पर्यत आंदोलन करा. रोज आंदोलन करा. पण कुणाचीही गाडी फोडू नका. जाळू नका, पण पुढे जाऊ देऊ नका. आंदोलनाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ देऊ नका,” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
“पोलिसांनी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलं तर अख्ख्या गावाने पोलीस ठाण्यात जाऊन बसू. आमदार, खासदार, मंत्री यांनी आता आमच्या दारासमोर यायचं नाही. दारासमोरची जागा आमची आहे. यांच्या दारातदेखील कुणी जायचं नाही. दारात यायचं नाही याचा अर्थ त्याने ठरवायचा आहे. निवडणुका मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये. आम्हाला आदर्श आचारसंहितेचा सन्मान राखता यायला पाहिजे,” असंही त्यांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, “निवडणुकीसाठी ज्या गाड्या येतील त्या पेटवू नका, फोडू नका. त्या गाड्या गोठयात नेऊन लावा आणि निवडणूक झाली की देऊन टाका. मराठा आरक्षण विषय संपवू द्या. नंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवणार, असे जरांहे म्हणाले आहेत.
“आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली तरच आम्ही माघार घेऊ. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी सरसकट करायला काय अडचण आहे? कुणबी प्रमाणपत्र ने घेणाऱ्यांना पश्चाताप होईल. 5-6 जण वगळता सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे. आता आपले कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे कुणबी मराठे एकच आहेत. ज्यांना कुणबी नको ते आपल्यावर रुसले आहेत त्यामुळे ज्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालंय त्यांनी ते घ्यावं,” असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.