पुणे : कोंढव्यातील घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आहेत. या प्रकारातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने तिने एका बाळाला जन्म दिला आहे. हा धक्कादायक प्रकार मुंबईतील डोंबिवली ईस्ट येथील एका सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या पीडित मुलीने २० फेब्रुवारीला फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मे २०२३ मध्ये घडला आहे. या प्रकरणी कोंढवा खुर्द येथे राहणाऱ्या १८ वर्षीय पीडित मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन डोंबिवली ईस्ट येथील वामन वजे हाईट्स मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित मुलीचे वडील आरोपी राहात असलेल्या मानपाडा सर्कल येथील वामन वजे हाईट्समध्ये कामाला होते. पीडित मुलगी वडिलांना मदत करण्यासाठी बिल्डिंगमध्ये घरकाम करण्यासाठी जात होती. मुलगी आरोपीच्या घरात घरकाम करत असल्याने दोघांची ओळख झाली होती. मे २०२३ रोजी पीडित मुलगी बिल्डिंगच्या टेरेसवर पाणी बंद करण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत अश्लील चाळे करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक सबंध ठेवले.
एवढंच नाही तर, आरोपी मुलीला याबाबत कोणाला काही सांगितले तर घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिला. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन कोंढवा पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा डोंबिवली पोलिसांकडून कोंढवा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव करत आहेत.