कऱ्हाड : महामार्गावर धावत्या एसटीच्या चालकाला हृदयविकाराचा जोराचा झटका आला. मात्र, अशा परिस्थितीतही चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी दुभाजकावर चढवून जागीच थांबवली. त्यामुळे ३१ प्रवाशांचे प्राण बचावले. परंतु, उपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कऱ्हाडनजीक वारुंजी गावच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली.
राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे मृत्यू झालेल्या एसटी चालकाचे नाव आहे. याबाबत वाहक फारुक कासीम शेख (रा. विटा) यांनी कऱ्हाड शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा आगाराची विटा ते स्वारगेट ही एसटी घेवून चालक राजेंद्र बुधावले व वाहक फारुक शेख हे दोघेजण कडेगावमार्गे कऱ्हाडमध्ये आले. त्यानंतर कऱ्हाड बसस्थानकातून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एसटी साताऱ्याकडे जाण्यासाठी निघाली. त्यावेळी एसटीमध्ये ३१ प्रवासी होते. एसटी महामार्गावर वारुंजी गावच्या हद्दीत आली असताना चालक बुधावले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांनी धावती एसटी दुभाजकावर चढवत थांबवली.
अचानक एसटी थांबल्यामुळे वाहक फारुक शेख हे केबिनमध्ये ड्रायव्हरजवळ गेले. त्यावेळी चालक बुधावले यांना प्रचंड घाम आला होता आणि ते चक्कर येत असल्याचे म्हणत होते. त्यानंतर शेख यांनी तातडीने सर्व प्रवाशांना खाली उतरवून दुसऱ्या एसटीत बसवले. तसेच चालक बुधावले यांना रिक्षातून रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचारादरम्यान बुधावले यांचा मृत्यू झाला. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.