पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात एकावर हल्ला करून पसार झालेल्या पाच आरोपींना नगर जिल्ह्यातील एका गावातून अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर असल्याचे समजताच आरोपी शेतात मचाण बांधून राहत होते. शहबाज मोइउद्दीन खान (वय ३०, रा. कृष्णानगर, महंमदवाडी), बालाजी मिन्ना मंगाली (वय ३५, रा. येवलेवाडी), सूरज राजेंद्र सरतापे (वय २५, रा. चिमटा वस्ती, फातिमानगर), जुबेर कद्दुस कुरेशी (वय ३५, रा. कासेवाडी, भवानी पेठ), रॉकी ॲथोंनी (वय ३१, रा. वानवडी बाजार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील समतानगर येथील एका तरुणावर हल्ला करून आरोपी पसार झाले होते. या हल्यातील आरोपी शहबाज याचे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात बेलापूर येथे शेत आहे. शहबाज आणि त्याचे साथीदार शेतात मचान बांधून राहत होते. पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर होते. त्यामुळे पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून ते रात्री मचाणावर झोपायचे.
याबाबतची माहिती पोलीस हवालदार सतीश चव्हाण आणि विशाल मेमाणे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपींना बेलापूर गावातून शहबाज याच्या शेतातून अटक करण्यात आली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक दिनेश पाटील, लेखाजी शिंदे, बालाजी डिगोळे, सतीश चव्हाण, लवेश शिंदे, निलेश देसाई, शाहीद शेख, लक्ष्मण होळकर, संतोष बनसुडे यांनी केली.