पुणे : पुण्यातील कोथरूडमधील जय भवानीनगर परिसरात गुरुवारी १५ फेब्रुवारीला सायंकाळी एका टोळक्याने किरकोळ वादातून एका तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या टोळक्याने तेथील ८ दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात २ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी एका गुन्ह्यात सौरभ संतोष गोडसे (वय २३, रा. जयभवानीनगर, कोथरूड) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, यश शाम भिलारे, मंदार रायरीकर, साहिल पायगुडे, मनीष मराठे, महेश पानगावकर (सर्व रा. जयभवानीनगर, कोथरूड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार सौरभ हे दोघे ओळखीचे आहेत. सौरभ आणि त्याचा मित्र गौरव गायकवाड जयभवानीनगर परिसरातील शिवराज चौकात गप्पा मारत बसले होते. त्यावेळी आमच्या चौकात का थांबला? अशी विचारणा करून आरोपींनी सौरभला बेदम मारहाण केली. आरोपी पानगावकरने त्याच्या हातातील कडे सौरभच्या डोक्यात मारल्याने दुखापत झाल्याचे सौरभने फिर्यादीत नमूद केले आहे.
या भांडणात दुसऱ्या गटाकडून विजय गणेश ठोंबरे (वय ४४, रा. माताळवाडी फाटा, भूगाव, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी याबाबत कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ठोंबरे यांचे जयभवानीनगर परिसरात दुकान आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गौरव सचिन गायकवाड, सुयोग संदीप दवंडे, साई विठ्ठल वाशिवले, सुयश दत्तात्रय पोळेकर, सुयश चव्हाण, स्वराज बोडके, सुमीत मोहिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौरभ याला जयभवानीनगर परिसरातील तरुणांनी मारहाण केल्याचे समजल्यानंतर त्याचे मित्र आरोपी गौरव, साई, सुयश, स्वराज, सुमीत तेथे आले. त्यांनी ठोंबरे यांच्या दुकानाच्या दरवाज्यावर सिमेंटचा गट्टू फेकून मारला. तसेच, दुकानासमोर लावलेल्या ८ दुचाकींची तोडफोड केली. कोथरूड पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.