पुणे : दारुच्या नशेत एका नराधमाने फूटपाथवर राहणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना जंगली महाराज रोडवरील डेक्कन पीएमटी बस स्टॉप समोर घडली आहे. गुरुवारी (दि.15) रात्री दोनवाजता ही घटना घडली. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
गोविंद घारोळे (वय-23 रा. पुलाचीवाडी, डेक्कन) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आयपीसी 376 नुसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. आरोपी आणि पीडित महिला आधीपासून एकमेकांच्या तोंड ओळखीचे होते. डेक्कन बस स्टॉपच्या मागील फुटपाथवर राहणाऱ्या पीडित महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.
बुधवारी रात्री डेक्कन पीएमटी बस स्टॉप मागील फुटपाथवर पीडित महीला झोपली होती. त्यावेळी आरोपी अचानक दारूच्या नशेत त्याठिकाणी आला. त्याने नशेत असताना महिलेवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. महिलेने प्रतिकार केला. मात्र, तो निष्फळ ठरला. झालेल्या अत्याचाराबाबत महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपीसोबत पीडित महिलेची आधीच ओळख असल्याने त्याला तत्काळ शोधून ताब्यात घेण्यात आले. गुन्ह्याची कबुली होताच, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.