पिंपरी, (पुणे) : पिंपरीमध्ये श्रीमंत मित्राला गांजाच्या केसमध्ये अडकवण्याची आणि तुरुंगात टाकण्याची धमकी देत पैसे उकळण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कटात दोन पोलिसांचाही सहभाग असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. या प्रकरणी १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून २ पोलिसांसह ८ जनांवर खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ऑनलाइनद्वारे ४ लाख ९७ हजार घेतल्याचं स्पष्ट केलं.
अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिरझा, शंकर गोरडे, मुन्नास्वामी, देहूरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ अशी आरोपींची नाव आहेत. या पैकी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुण हा पिंपरी- चिंचवडमधील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्याच्या मित्रांनी त्याचा विश्वास संपादन केला. त्याची सर्व माहिती घेत तो श्रीमंत असल्याचं समजताच त्याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. मित्रांनी आधीच ओळखीच्या पोलिसांना माहिती देऊन, खंडणी उकळण्याचा कट रचला. यासाठी १९ वर्षीय तक्रारदार तरुणाला कॅफेत बोलावून कॉफी पिता पिता त्याला बोलण्यात गुंतवलं आणि त्याच्या खिशात गांजाची पुडी टाकली.
तिथं आधीच बोलावून ठेवलेल्या दोन पोलिसांना गांजाची पुडी खिशात टाकल्याली समजली. मग पोलिसांनी त्याची तपासणी केली अन त्याच्याकडे गांजाची पुडी आढळली. पण काही कळायच्या आत त्या तरुणाला पोलिसांनी देहूरोड पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. या गुन्ह्यातून सुटका करून घ्यायची असेल तर २० लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी मित्रांसह पोलिसांनी केली.
आता गुन्हा दाखल होणार म्हणून घाबरलेल्या तरुणाने जागेवरच ४ लाख ९८ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने आरोपींच्या खात्यावर टाकले. मग त्याला सोडून देण्यात आलं. मात्र हा केलेला बनाव देहूरोड पोलिसांच्या कानावर पडला. यानंतर तपास सुरु केले आणि मित्रांसह दोन्ही पोलिसांचे बिंग फुटले. देहूरोड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मात्र, संबंधित पोलिसांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे तपास करीत आहेत.