केडगाव: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांच्या घरी भेट दिली. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. बारामती लोकसभा निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लढवणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे.
सुनेत्रा पवार यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दौंड येथील निवासस्थानी जाऊन ही भेट घेतली. यावेळी आमदार राहुल कुल, त्यांच्या पत्नी कांचन कुल, आमदार कुल यांच्या मातोश्री रंजना कुल यादेखील उपस्थित होत्या. या भेटीत सुनेत्रा पवार यांनी भोजनही केले. लोकसभेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहे. या निवडणुकांसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तसेच शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडून आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे. यासाठी उमेदवारांची चाचपणी सध्या सुरू आहे. अशातच बारामती लोकसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून बारामती लोकसभा निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. अशातच सुनेत्रा पवार यांनी कुल कुटुंबियांची भेट घेतल्यानं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील लोकसभेला भाजपकडून आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी निवडणूक लढविली होती. त्यामुळे या भेटीला अधिकच महत्त्व प्राप्त झालं आहे.
दरम्यान, या नेत्यांमध्ये सुमारे तीन तास बंद दाराआड चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या भेटीमुळं सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात लोकसभेची मोर्चेबांधणी तर सुरु केली नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.