नागपूर : बलात्काराच्या गुन्ह्यात कारागृहातून जामिनावर सुटताच तरुणाने आपल्या जुन्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिला अक्षरश: कारखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला. ही थरारक घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टीव्ही टॉवर ते आयबीएम मार्गावर घडली. राज ऊर्फ राघवेंद्र यादव असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम 307 नुसार प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
जामीनावर सुटताच जीवघेणा हल्ला
सोशल मिडियाच्या माध्यमातून 23 वर्षीय तरुणीची आरोपी राजसोबत ओळख झाली होती. दरम्यान त्याच्यात अधिक जवळीक निर्माण झाली. त्यानंतर राजने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. मात्र लग्नाचा विषय काढताच तो कायम टाळाटाळ करत होता.
राजने 2021 मध्ये दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न केले. मात्र कालांतराने तरुणीला याबाबत माहिती पडले असता तिला जबर धक्क बसला. त्यानंतर तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठून घडलेला प्रकार सांगत तक्रार नोंदवली. या गुन्ह्यात आरोपी राज तुरुंगात देखील गेला होता. मात्र त्यानंतर बदला घायचे त्याच्या मनात होते. जामिनावर बाहेर येताच त्याने पीडित तरुणीचा शोध घेलता आणि सोमवारी, 12 फेब्रुवारी सायंकाळी साडे सात ते आठच्या सुमारास त्याने तीचा पाठलाग सुरू केला. तिच्या मोपेडला मागून जोरात धडक दिली. पडल्यामुळे तिच्या हातापायाला, कंबरेला जबर मार लागून ती जखमी झाली. मोपेडचे देखील नुकसान झाले. त्यानंतर तरुणीने पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली असता गिट्टीखदान पोलिसांनी आरोपी राजविरुद्ध कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.