पुणे : पुण्यात व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:वर वार करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका मजनूने स्वत:च्या हातावर ब्लेड मारुन स्वत:ला जखमी करून घेतले आहे. याप्रकरणी युवराज रवींद्र बारडे (वय २४, रा. पर्वती दर्शन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दत्तनगर परिसरातील एका १६ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मुलीच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, युवराज बारडे आणि सादर मुलगी हे दोघे २०२३ पासून एकमेकांना ओळखत आहेत. आरोपीने मैत्री करुन त्यांच्याशी जवळीक वाढवली. तू मला आवडतेस तुला मीच शिवणार, तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे, जर माझ्याशी नाही बोलली आणि माझ्याशी संबंध ठेवले नाही, तर मी माझ्या जीवच बरेवाईट करुन घेईल, अशी सतत धमकी देत असत.
फिर्यादी यांच्याशी लैगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने तो बोलू लागल्याने फिर्यादी या घरी निघून आल्या. त्यांचा पाठलाग करुन तो फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादी यांनी त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने तुम्हाला आता दाखवतोच काय असते ते असं म्हणून स्वत:ला ब्लेडने मारुन जखमी केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील करत आहेत.