राजेंद्र (बाप्पू) काळभोर
पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपल्या जन्मापासूनच दूध महत्त्वाचे मानले जाते. नवजात बालकाचे पोषण ते एक वर्षाचे होईपर्यंत, आईच्या दुधावरच होत असते. त्यानंतरसुद्धा आयुष्यभर दूध हा आपल्या आहाराचा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. दूधातून आपल्याला शरीराच्या वाढीसाठी अत्यावश्यक असलेली प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, कॅल्शियम असे प्रमुख अन्नघटक व शरीराला अत्यंत आवश्यक अशी जीवनसत्वे देखील मिळतात. त्यामुळेच मानवी जीवनात दूध हे एकाप्रकारे जीवनदायी अमृतच ठरते. पण हेच अमृत फक्त पैसा मिळवण्यासाठी त्यात भेसळ करणाऱ्या नराधमांच्या हाती पडते तेंव्हा ते रोगांच्या, दुर्धर आजारांच्या आणि प्रसंगी मृत्यूच्या खाईत लोटणारे विष ठरू शकते.
दूधवाल्यामार्फत किंवा पिशवीद्वारे घरी येणारे दूध किती शुद्ध आहे, याचा अंदाज कोणत्याही ग्राहकाला लावता येत नाही. दुधामध्ये वेगवेगळे घातक पदार्थ मिसळून भेसळ केली जाते. भेसळ करणाऱ्यांना आपण सामान्य ग्राहकांच्या जीवाशी खेळत असतो हे माहित असते. तरीही कमी कष्टात जास्त पैसे कमावण्याच्या मोहापायी ही मंडळी भेसळ करीत असतात. अधूनमधून होणाऱ्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात दूध नष्ट करूनही ग्राहकांना होणारा दूध पुरवठा अजिबात कमी होत नाही.
आपल्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाच्या रूपाने या विषयावर काम करणारी शासकीय यंत्रणा उपलब्ध आहे. पण अनेक कारणांमुळे त्या यंत्रणेकडून जितक्या प्रभावीपणाने काम अपेक्षित आहे तितके होऊ शकत नाही. या विषयाचा आपल्या आणि विशेषतः आपल्या घरातल्या लहान मुलांच्या स्वास्थ्याशी संबंध आहे. कधीकाळी दुधात फक्त पाण्याचीच भेसळ होत आहे. आता फक्त पाण्याचीच भेसळ झाली तर आपले सुदैवच आहे असेच म्हणावे लागते. आपल्या शरीराला घातक असलेल्या अनेक पदार्थांचा वापर आज दुधातल्या भेसळीसाठी केला जातो.
सातत्याने मागणी आणि पुरवठा याचे प्रमाण व्यस्त राहिलेल्या दुधात जीवघेण्या रसायनांची सातत्याने भेसळ होत आहे. यातून भेसळ करणारे पैसे कमवत असले तरी अनेकवेळा ग्राहकांचा जीव मात्र धोक्यात येऊ लागला आहे. दुधाची भेसळ अनेक वर्ष खुलेआम होत असल्याचे ‘अन्न व औषध’ प्रशासन विभाग अधूनमधून भेसळखोरांच्याविरोधात करत असलेल्या कारवाईतून स्पष्ट होते. दुधाच्या संकलनापेक्षा मागणी अधिक असून ती नकली दुधाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.
दुधात युरिया मिसळला की चवीत फरक पडत नाही, फेस येत नाही, दूध नासत नाही, पण त्याची घनता वाढते. हा प्रकार भेसळखोरांचा आवडीचा मानला जातो. मात्र, तितकाच तो ग्राहकांसाठी जीवघेणा ठरतोय. दुधात भेसळ करून पैसे मिळविण्यापेक्षा थेट चक्क दुधासारखे दिसणारे रासायनिक पदार्थाचे मिश्रणच दूध म्हणून विकायला अनेकांनी सुरुवात केली आहे. मध्यंतरी झालेल्या एका चाचणीत राज्यभरातील विकल्या जाणाऱ्या एकूण दुधात निम्म्यापेक्षा जास्त दुधाचे नमुने सदोष असल्याचे समोर आले होते.
प्रामाणिक उत्पादकाला दुधाला भाव न मिळण्याचे कारण हे दुधात मोठ्या प्रमाणावर होणारी भेसळ व त्याकडे सरकारचे होणारे हेतूपुरस्पर दुर्लक्ष हे ठरत आहे. दूध उत्पादनासाठी व दीर्घकाळ टिकण्यासाठी दुधामध्ये वेगवेगळे रासायनिक पदार्थ मिसळण्यात येतात. सन २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला होता की, भारतामध्ये ६८.७ टक्के दूध हे भेसळ युक्त असून ते जागतिक गुणवत्तेप्रमाणे नाही. यावर निर्बंध यातले नाहीत तर आगामी काळात ८५ टक्के लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता आहे. एका संस्थेने महाराष्ट्रात ६९० नमुने तपासून महाराष्ट्रात ७८ टक्के दूध भेसळयुक्त असल्याचा निष्कर्ष, मार्च २०२० च्या आपल्या अहवालात काढला आहे. भेसळीमुळे विविध विकार, आजार यांना आमंत्रण मिळू लागले आहे.
आपल्या व भावी पिढीच्या आरोग्यासाठी शासकीय, वैयक्तिक, सामाजिक, संस्थात्मक अशा सर्व पातळीवर या संदर्भात तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. अन्यथा प्रत्येक घरातील एका सदस्याला कॅन्सर झाल्यावर आपण जागे होणार असू तर त्यावेळी खुप उशीर झालेला असेल.
(लेखक हे पत्रकार असून ते पुणे प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत)