पुणे : पुण्यातील वाघोली पोलीस चौकीसमोर एक धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी एका वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने पोलीस चौकी समोर स्वतःला पेटवून घेतल्याची घटना घडली आहे. रोहिदास अशोक जाधव ( वय २८, रा. सिद्धी अपार्टमेंट, डोमखेल रोड, वाघोली ) असं पेटवून घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.
यामध्ये तरुण ९० टक्के भाजला असून गंभीर जखमी झाला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले असून त्याची परिस्थिती चितांजनक असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रोहिदास जाधव राहत असलेल्या ठिकाणी तेथील अन्य व्यक्तींकडून त्याला मानसिक त्रास दिला जात होता. त्या व्यक्तीशी अनेक दिवसापासून वाद सुरु होते. तसेच त्याला काही दिवसापूर्वी त्याने मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. मात्र त्यांच्यावर कारवाई केली जात नव्हती.
कारवाईला होत असलेला उशिर पाहून रोहिदास आणखी संतापला. याच रागातून त्याने आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वाघोली पोलीस चौकी समोर येत स्वत:ला पेटून घेतले. यामध्ये तो ९० टक्के भाजला आहे. त्याला वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.