मुंबई: काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला आहे. राजकीय भूमिका आगामी एक दोन दिवसांमध्ये जाहीर करेन, असे चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेसला सोडण्यासाठी तसं कोणतंही कारण नाही आणि मला प्रत्येक गोष्टीचं कारण सांगताही येणार नाही. मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले. काँग्रेस पक्षाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच अशोक चव्हाण यांनी माध्यमांसोबत संवाद साधला.
“भारतीय जनता पक्षाची कार्यप्रणाली मला अद्यापही माहिती नाही, भाजपमध्ये जाण्याचा निर्णय मी अजुनही घेतलेला नाही. प्रत्येक गोष्टीला काही कारण असलेच पाहिजे असे देखील नाही. माझ्या जन्मापासून मी काँग्रेसचे काम केले आहे, मला वाटलं आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून मी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले. मला कोणत्याही पक्षांतराविषयी जाहीरपणे बोलायचे नाही. मला कोणाचीही उणीदुनी देखील काढायची नाहीत, मला वाटलं आता वेगळ्या पर्यायाचा विचार केला पाहिजे, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.