पुणे : पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ल्याची पोलिसांना पूर्वकल्पना होती. मात्र, पोलीस चित्रपटातील पोलिसांप्रमाणे उशीरा पोहोचले, असा खळबळजनक आरोप वागळे यांनी केला होता. या आरोपाचे पुणे पोलिसांनी खंडन केले आहे. पोलिसांची सूचना डावलून आणि नियोजित मार्गात बदल करून पत्रकार निखिल वागळे सभास्थानी गेले. त्यामुळे त्यांच्या गाडीवर झालेला हल्ला रोखणे शक्य झाले नाही. वाहतूक कोंडीमुळे पोलिसांनी तातडीने तेथे पोहोचण्यास विलंब झाला, असा खुलासा करणारे पत्रक पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिले. दरम्यान, पोलिसांच्या जनसंपर्क विभागाने पाठवलेल्या या पत्रकावर कोणत्याही अधिकाऱ्याची स्वाक्षरी नाही.
निखिल वागळे यांनी समाजमाध्यमात वादग्रस्त टिप्पणी केल्याने पुण्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. निखिल वागळे यांचे पुण्यात आगमन झाल्यावर त्यांच्या नियोजित मुक्कामाच्या ठिकाणी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले. या दरम्यान पुण्यात त्यांच्याविरुद्ध निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाची माहिती त्यांना देण्यात आली. पोलिसांच्या सूचना मिळेपर्यंत कार्यक्रमस्थळी जाऊ नका. कार्यक्रम स्थळाच्या परिसरात मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले आहेत. आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतरच वागळे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी जावे, असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र, वागळे यांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा आग्रह धरला. त्यावेळी पोलीसांनी त्यांना कार्यक्रमाचे ठिकाण सुरक्षित करणे आवश्यक आहे. तोपर्यंत तेथे जाऊ नये, असे सांगितले. कार्यक्रमाच्या ठिकाणी झालेल्या आंदोलकांच्या गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे आंदोलकांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू होती अशा परिस्थितीत पोलिसांना बळाचा वापर करणे कठीण झाले होते.
दरम्यान, निखिल वागळे पोलिसांनी सूचना देऊनही कार्यक्रमाचे ठिकाणी गेले. त्यांनी पोलीसांच्या वाहनांना चकवा देत नियोजित मार्ग देखील बदलला. साध्या वेशातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाहनाचा पायी पाठलाग करून आंदोलकांपासून त्यांना सुरक्षित ठेवले होते. निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाला. तेव्हा वागळे यांच्या गाडीत त्यांच्या सुरक्षिततेसाठी साध्या वेशातील पोलीस होते. मात्र, तेथे वाहतूक कोंडी झाली होती. पादचारी आणि बघ्यांमुळे वागळे आणि त्यांच्या मोटारीला अशा परिस्थितीत बळाचा वापर करून त्वरीत बाहेर काढणे शक्य नव्हते.
आरोपींविरुद्ध दंगल, मालमत्तेचे नुकसान या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेची प्रक्रिया सुरू झाली असून, पुणे शहर पोलिसांकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.