बॉलीवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृत्ती बिघडली आहे. त्यांना मध्यरात्री ब्रेनस्ट्रोक आला. त्यामुळे त्यांना अचानक रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर कोलकाता येथील अपोलो रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री त्यांना छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांना रुग्णालयात नेण्यात आले.
मिथुन चक्रवर्ती हे आता ७३ वर्षांचे आहेत. न्यूरोसर्जन डॉ. संजय भौमिक अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्यावर उपचार करत आहेत. अद्याप दिग्गज अभिनेत्याच्या प्रकृतीबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. नुकतेच मिथुन यांना चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी देशाच्या प्रतिष्ठित पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
याआधी ही २०२२ मध्ये मिथुन चक्रवर्तींचा हॉस्पिटलमधून एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यानंतर चाहते नाराज झाले होते. त्या फोटोमागे अनेक अफवाही पसरवल्या गेल्या. त्यानंतर त्यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती याने वडिलांच्या तब्येतीची माहिती दिली. वडिलांच्या किडनीमध्ये स्टोन असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मिथुन चक्रवर्ती यांनी ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेली आहे. सध्या त्यांच्या शास्त्री या सिनेमाचं शुटिंग सुरु आहे.