पुणे : निखिल वागले यांनी नुकतेच माझी पंतप्रधान आणि भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना मिळालेल्या भारतरत्न पुरस्कारावर खालच्या थराला टीका केली आहे. यामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करत गाडीच्या काचा फोडल्या तसेच शाई फेक केल्याची घटना घडली आहे.
याबाबत पुणे पोलिसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यात निर्भय बनो हा कार्यक्रम राष्ट्रीय सेवा दलातर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाला. दरम्यान, या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती अशी प्रतिक्रिया पुणे पोलिसांनी दिली आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे.
पोलीस अधिकारी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा दलाने आयोजित केलेल्या निर्भया बनो कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मी हे जबाबदारीने सांगू शकतो की या कार्यक्रमाला परवानगी नव्हती. परंतु, निखिल वागळे येणार असल्याने आम्ही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला होता. कारण, त्यांच्यावर कालच पुणे शहरांत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्याविरोधात वातावरण असल्याची कल्पना आम्ही त्यांना आधीच दिली होती. त्यांच्यासाठी सुरक्षाही पुरवली होती.
आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात
निखिल वागले हे त्यांच्या खासगी गाडीतून निघाले. त्यांनी पोलीस सुरक्षा घेतली नाही. ते कार्यक्रम स्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कोणीतरी दगडफेक केली. त्यामुळे, सीसीटीव्ही फुटेज पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल. आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून विश्रामबाग पोलीस ठाणे आणि डेक्कन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.