युनूस तांबोळी
शिरूर : आम्र तरूवर फुलला मोहोर… हिरवा, तांबूस चित्र मनोहर… फळांचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या आंब्याच्या बागा सध्या शेतशिवारात हिरव्या-पिवळ्या मोहराने बहरलेल्या दिसत आहेत. हिरव्यागार कैऱ्या बच्चे कंपनीला खुणावत असल्याचे मनमोहक चित्र मनाला सुखावत आहे.
उन्हाळा सुरू झाला की वातावरणात बदल जाणवू लागतो. त्यातून सर्वांना आठवण येते ती फळांचा राजा आंब्याची. बाजारात आंबा कधी विक्रीसाठी येतो, याकडे खवय्यांचे लक्ष लागले आहे. सध्या सगळीकडे आंब्याच्या बागा कमी-अधिक प्रमाणात मोहोराने फुलल्या आहेत. या मोहोराचा सुंगध आसमंतात दरवळत आहे. लाल-पिवळ्या मोहोराने फुललेल्या आंब्याची झाडे अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मोहोराने फुललेल्या आंब्याच्या झाडावर फळांचे सेंटिंग होण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत.
मोहाराने फुललेल्या आंब्याची गळ होऊ नये यासाठी शेतकरी औषधांच्या फवारण्या करत आहेत. वातावरणात सारखा बदल होत असल्याने अनेकदा मोहोर गळतीचे प्रकार होतात. त्यासाठी कृषी विभागाचा सल्ला घेऊन आंबा पिकाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सध्याच्या वातावरणात आलेल्या बहरामुळे आंब्याचे पिक जोमात येण्याची शक्यता असल्याचा अंदाज शेतकरी वर्तवत आहेत. राज्यातील काही भागांतून कैरी बाजारपेठेत दाखल झाल्याचे दिसत आहे.
मोहाराने फुललेल्या आंब्याच्या बागेचा नजारा काही वेगळाच आहे. बराच वेळ बागेत बसून त्याचा आनंद घेता येतो. आंब्याचा सुंगध सध्या सर्वत्र दरवळत आहे, असे उद्गार आंबा बागायतदार आणि चांडोहचे पोलीस पाटील सुदर्शन भाकरे यांनी काढले.
तर जांबूत येथील माजी चेअरमन बाळासाहेब बदर म्हणाले की, उत्तम वातावरणामुळे सध्या आंब्याला मोहोर आला आहे. त्यामुळे आंब्याची झाडे डोलदार व मनमोहक दिसू लागली आहेत. फळांची गळती होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत आहोत.
विद्यार्थ्यांना आंबा या फळाचे विशेष आकर्षण असते. आवारात लावलेल्या आंब्याच्या झाडांना पाणी घालताना आंब्याच्या फळाची प्रतिक्षा विद्यार्थ्यांना असते. सध्या ही आंब्याची झाडे बहरली असून, विद्यार्थी या झाडांची काळजी घेत आहेत.
– युवराज थोरात, शिक्षक, थोरात वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा