पुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आहे. नव्या पोलिस आयुक्तांसमोर शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचे आव्हान असतानाच आता त्यांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात एकप्रकारे मोहीम सुरु केली आहे. अवैध धंदे पूर्णपणे थांबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून, तसे न केल्यास कारवाई केली जाणार असल्याचा सज्जड दमच पोलिस अधिकाऱ्यांना दिला. तसेच कोणाला जर प्रेमाची भाषा समजत नसेल तर त्यांनी त्यांचा आगीसोबत खेळण्याचा शौक पूर्ण करावा, असेही ते म्हणाले.
पोलिस आयुक्त कुमार हे पत्रकारांशी बोलत होते. आगामी काळात शहरात कुठलेही अवैध धंद्ये चालू राहणार नाहीत. शहरातील पब रात्री दीडनंतर पूर्णपणे बंद राहणार आहेत. एका दिवसात सर्वच प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझ्याकडे काही जादूची कांडी नसल्याचे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले. मात्र, पुणे पोलिसांच्या कामांमध्ये पारपदर्शकता राहणार असून, परिणामकारक पोलिसिंग करण्यावर आमचा भर असणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून देखील पुणे पोलिस योग्य ती पावले उचलणार असून, आवश्यक तिथे दामिनी पथकाची पेट्रोलिंग वाढविण्यात येणार आहे.
याशिवाय, वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी पुणे पोलिस तत्पर असून, त्या दृष्टीकोनातून मंगळवारी आयुक्तालयात बैठक ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये आपण स्वतः पोलिस अधिकार्यांना सूचना करणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
77 पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करणार
5 वर्षापेक्षा अधिक काळ एकाच पोलिस स्टेशन अथवा एकाच विभागात (गुन्हे शाखा / वाहतूक शाखा / विशेष शाखा / मुख्यालय) कर्तव्य बजाविणार्या पोलिस कर्मचारी तसेच अधिकार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. या 77 पोलिस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य
शहरात ज्या-ज्या प्रमुख चौकामध्ये वाहतूक कोंडी होते. त्याच्या वेळा काय आहेत, ती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याच संदर्भात मंगळवारी पोलिस आयुक्तालयात वाहतूक शाखेच्या अधिकार्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. वाहतूक कोंडी होणार्या प्रमुख चौकांची यादी काढून त्यावर तोडगा काढण्यात येणार आहे.
…तर पोलिस अधिकाऱ्यांकडेच मागणार उत्तर
रेकॉर्डवरील तडीपार, पॅरोलवर सुटलेले, खून, खुनाचा प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यातून जामिनावर असलेल्या गुन्हेगारांकडून गुन्हा घडल्यास त्याबाबतचे उत्तर संबंधित पोलिस अधिकार्यांना, संबंधित पोलिस स्टशेनच्या तपास पथकास (डीबी) विचारण्यात येणार आहे. तडीपार गुन्हेगार शहरात आढळून आल्यास त्याच्यावर तर कारवाई होणारच आहे. पण संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकार्याकडे त्याबाबत त्याच्यासंबंधीची विचारणा देखील करण्यात येणार आहे.