पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर याच्या नावाने स्वाती मोहोळ यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. सोशल मीडियावरून मुन्ना पोळेकरच्या नावाने एक अकाऊंट बनवत शरद मोहोळची पत्नी स्वाती यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्वाती मोहोळ यांना मेसेज करुन आणि आक्षेपार्ह पोस्ट करत धमकी दिली आहे.
मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा शरद मोहोळ हत्या प्रकरणातील एका महत्वाचा आरोपी आहे. आता त्याच्याच नावानेच या धमक्या देण्यात येत असल्याने पुणे पोलिसांनी गुन्हे शाखेकडून याबाबत अधिक तपास सुरु आहे. पाच जानेवारीला पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूड मधील सुतारदरा परिसरात गोळ्या झाडून हत्या आली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून सुरु आहे. शरद मोहोळच्या हत्येनंतर त्याची पत्नी काही दिवसांनंतर माध्यमांसमोर आली होती. माझ्या पतीच्या जाण्याने मी खचणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ आणि फिर्यादी अरुण धृपद धुमाळ यांनी गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यापासून जीवाला धोका असल्याचे आपल्या पुरवणी जबाबामध्ये म्हटले होते. याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाला देखील दिली होती. दरम्यान आता अजून एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा स्वाती मोहोळ यांनी केला आहे.