सुरेश घाडगे
परंडा : आगामी नगर परिषद निवडणुकीचे जोरदार नियोजन निवडणूक विभागाकडून होत आहे. येथे एकूण १६ हजार २३३ मतदार आहेत. या अनुषंगाने परंडा नगर परिषदेच्या १० प्रभागात एकूण १९ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. प्रभाग क्र . ९ साठी एक तर इतर ९ प्रभागात प्रत्येकी दोन मतदान केंद्र नियोजित करण्यात आलेली आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या नियोजनानुसार प्रत्येकी एका मतदान केंद्रात ९०० ते १००० मतदार संख्या जोडण्यात आली आहे.
प्रभाग १ मध्ये २०५७ मतदार, प्रभाग २ मध्ये १६५७ मतदार, प्रभाग ३ मध्ये १७७१ मतदार, प्रभाग ४ मध्ये १४९३ मतदार, प्रभाग ५ मध्ये १५८७ मतदार, प्रभाग ६ मध्ये १६०० मतदार, प्रभाग ७ मध्ये २०२८ मतदार, प्रभाग ८ मध्ये १६८५ मतदार, प्रभाग ९ मध्ये १०८७ मतदार, प्रभाग १० मध्ये १३४८ मतदार आहेत. एकूण १० प्रभागात १९ मतदार केंदांर्तगत एकूण १६ हजार २३३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.ऐन पावसाळ्यात निवडणूक लागली आहे . त्यामुळे सर्वच नेते, पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते तथा प्रचारकांची कसरत होणार आहे.
गुरूवार दि .१८ ऑगष्ट रोजी पावसाळ्यात मतदानाचा दिवस ठरला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुकांनी निवडणुक मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. परंडा शहराची लोकसंख्या १८७५८ तर मतदारसंख्या १६२३३ आहे . यानुसार १० प्रभाग करण्यात आलेले आहेत.
प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे २० सदस्य संख्या झाली आहे .यापूर्वी ८ प्रभाग व १७ सदस्य संख्या होती. यामध्ये २ प्रभाग वाढवून ३ सदस्य संख्या वाढवली आहे.
या निवडणुकांच्या अनुषंगाने True Voter ॲप मधील असंख्य विविध सुविधांचा उपयोग मतदारांनी, संभाव्य उमेदवारांनी, त्यांचे कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे करावा जेणेकरून अत्याधुनिक सुविधांचा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतील मतदारांना व विशेष करून संभाव्य उमेदवारांना अधिकाधिक लाभ घेता येईल, याकरिता रोज दुपारी ४ ते ५ व त्याच लिंकवर संध्याकाळी ८ ते ९ दरम्यान झूम वर ऑनलाईन ट्रेनिंग देण्याची व्यवस्था निशुल्क करण्यात आलेली आहे. या प्रशिक्षणाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून केल्या जात आहे.