नारायणगाव: पुणे जिल्हा आणि परिसरात कुस्तीसाठी प्रसिद्ध पैलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार (वय-39, राहणार निमगाव सावा, ता. जुन्नर) या तरुणाचा शनिवारी दुपारी धारदार शस्त्राने वार करत निर्घृन खून करण्यात आला. त्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. ही घटना मांजरवाडी येथे घडली. नारायणगाव पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार गजराबाई सोनबा साळुंके या महिलेचा अंत्यविधी शनिवारी (३ फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता सुमारास मांजरवाडी येथे झाला. या अंत्यविधीसाठी पैलवान कैलास पवार हे आपल्या नातेवाईकांसह उपस्थित होते.
साळुंके यांचा अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार आणि तीन ते पाच नातेवाईक हे मांजरवाडी येथील एका हॉटेलमध्ये दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास चहापाण्यासाठी थांबले होते. दरम्यान जुन्या भांडणातून पैलवान कैलास पवार व त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर कैलास पवार हे तेथून बाहेर पडले. हॉटेल जवळील रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ संशयित आरोपींनी कैलास पवार यांच्या छाती, पाठ व खांद्यावर धारदार शास्त्राने वार केले. यामध्ये कैलास पवार हे गंभीर जखमी झाले.
पवार यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी हॉस्पिटलबाहेर मोठ्या संख्यने लोक जमले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी ग्रामीण रुग्णालयाला भेट देत जमावाला शांत केले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. तसेच रुग्णालयाबाहेर बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक निरीक्षक महादेव शेलार करत आहे. पोलिसांना संशयित आरोपींची नावे मिळाली असून आरोपींना अटक करण्यासाठी विविध पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.