पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे याला काही दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, मुख्य सूत्रधारांसह अटकेत असलेल्या साथीदारांकडे गुन्ह्याचा रचलेला कट, तयारी आणि घडलेली प्रत्यक्ष घटना, अशा तीन दृष्टीने कसून तपास केला जात आहे. मोहोळ याची हत्या करण्यापूर्वी शेलार आणि मारणे यांच्यात बैठक झाली होती.
त्याच्या चौकशीसह गोपनीय अहवालानुसार महत्त्वपूर्ण तपास करणे अद्याप बाकी आहे. मारणेसह त्याच्या अन्य ६ साथीदारांचा एकत्रित तपास करायचा असल्याने सहा जणांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी केली आहे. त्यानुसार विशेष मोक्का न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी सात आरोपींच्या पोलिस कोठडीत ९ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.
शरद मोहोळ खून प्रकरणात अटक करण्यात आलेल्या विठ्ठल शेलार, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले यांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना विशेष मोक्का न्यायालयात हजर करण्यात आले होते.
या वेळी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील प्रमोद बोंबटकर म्हणाले, तपासात आणखी कुणाचा सहभाग आहे का? हे तपासायचे असल्याने आरोपींना ८ दिवस पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच त्यास बचाव पक्षाच्या वतीने अॅड. केतन कदम यांनी पोलिसांना तपासाला पूर्ण वेळ दिला आहे. दरवेळी पोलिस नवीन थिअरी समोर आणतात. त्यामुळे कमीत कमी पोलिस कोठडी द्यावी, असे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, तांबे यांनी आतापर्यंत या गुन्ह्यात १६ आरोपींना अटक केली आहे. मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह सर्व आरोपींची एकत्रित चौकशी करायची असून आरोपींनी काही प्रॉपर्टी खरेदी केली आहे का? या अनुषंगाने सर्व आरोपींची एकत्र चौकशी करायची आहे. आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास अधिकारी तांबे यांनी केली होती, त्यामुळे न्यायालयाने आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ केली आहे.