लोणी काळभोर : मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षांपासून अविरत प्रयत्न सुरू होते. अखेर शनिवारी (दि. २७ जानेवारी) राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. त्याचे अध्यादेशही काढण्यात आले आहेत. मनोज जरांगे यांनी ही घोषणा करताच, सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या आंदोलनासाठी आपले सर्वस्व झोकून देणाऱ्या मराठा बांधवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पूर्व हवेलीतील मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करून एकच जल्लोष केला.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचन सह परिसरातील गावांमध्ये शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भगवी लाट उसळली होती. लोणी काळभोर येथील मराठा बांधवांनी दत्त मंदिराजवळ सकाळपासूनच फटाक्यांची आतिषबाजी करण्यास सुरवात केली. यावेळी एक मराठा, लाख मराठा घोषणांनी हा परिसर दुमदुमून निघाला. त्यानंतर मराठा बांधवांनी भक्ती-शक्ती चौकात जाऊन छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व मराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा केला.
पूर्व हवेलीतील काही गावांमध्ये चक्क ढोलाच्या तालावर ठेका धरत नागरिकांनी आनंद व्यक्त केला. कोणी रस्त्यावर फुगडी घालून आनंद व्यक्त करू लागले, तर काहींनी भगवा फडकावत, जोरदार घोषणा देत तर काहींनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. इतक्या महिन्यांच्या मेहनतीला यश मिळाल्याने त्याचा निर्भेळ आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसला.
मराठा समाज ७० वर्षांपासून आरक्षणापासून वचिंत राहिला. अनेक वेळा त्यासाठी लढा दिला पण शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यावर आरक्षण हुलकावणी द्यायचे. पण आज मनोज जरांगे यांच्यासारखा प्रामाणिक नेता मराठा बांधवाना भेटला आणि त्यांच्या अथक प्रयत्नांनी आम्हाला आरक्षण मिळवून दिले. आज हा आमच्या जीवनातील सर्वात महत्वाचा क्षण आहे, अशा भावना आंदोलकांनी व्यक्त केल्या. तसेच आज खऱ्या अर्थाने मराठा समाजाचा ऐतिहासिक विजय झाले आहे, अशी प्रतिक्रिया एका आंदोलकांनी व्यक्त केली आहे.