नवी दिल्ली: बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गोंधळादरम्यान, काँग्रेसने स्पष्ट केले की मुख्यमंत्री नितीश कुमार यांना ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनायचे होते. काँग्रेसने यावर कोणताही आक्षेप घेतला नाही आणि नितीशकुमार हे विरोधी आघाडीचे समन्वयक असावेत, असे 13 पक्षांनाही पटवून दिले होते. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हे मान्य केले नाही. दिल्लीतील बैठकीत ममता बॅनर्जी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमवेत पंतप्रधानपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव पहिल्यांदा उचलले, तेव्हा खरगे आणि काँग्रेसने लगेच नकार दिला.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतरही जेव्हा ‘इंडिया’ आघाडीच्या अध्यक्षपदासाठी खरगे यांचे नाव निश्चित झाले, तेव्हा काँग्रेसने त्यांची घोषणा थांबवली. कारण त्या प्रकरणात नितीश कुमार समन्वयक व्हायला तयार नव्हते. वास्तविक, जातीय जनगणना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जींना नितीशकुमारांचे नेतृत्व अजिबात नको होते. नितीशकुमार यांनी बिहारमध्ये जातीय जनगणना केली होती.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्गे यांचे नाव पुढे येताच वाद आणखी वाढला, त्यानंतर नाराज झालेल्या नितीश कुमार यांनी जात जनगणना आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी यांचा खरपूस समाचार घेत त्या ब्राह्मण आहेत, त्यामुळे त्या निश्चितपणे विरोध करतील, असे सांगितले. यानंतर ममता बॅनर्जी आणि नितीशकुमार यांच्यातील मतभेद ‘इंडिया’ आघाडीसाठी अडचणीचे ठरले. आता नितीश कुमारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस सोनिया गांधी यांना ट्रम्प कार्ड म्हणून वापर करू शकते. सोनिया गांधी नितीश यांच्याशी फोनवर बोलू शकतात. त्याचबरोबर नितीश यांनी लालू यादव यांना सलग 5 वेळा फोन करूनही त्यांचा फोन उचलला नाही.
काँग्रेसचे अनेक आमदार भाजप आणि जदयूच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे प्रमुख नितीश कुमार इंडिया आघाडी सोडून राज्यात पुन्हा भाजपमध्ये सामील होत असल्याच्या अफवांच्या दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी सांगितले की, नितीश कुमार यांच्या बाहेर पडण्याने आघाडीवर फारसा परिणाम होणार नाही.