पुणे : अजित पवार यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. पोलीस कवायत मैदान येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. अजित पवार यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल आदी उपस्थित होते.
शानदार संचलनाद्वारे राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. संचलनाचे नेतृत्व परेड कमांडर दर्शन दुगड यांनी केले. संचलनात पुणे शहर, ग्रामीण, पिंपरी-चिंचवड पोलीस दल पुरुष व महिला, पुणे शहर पोलीस आयुक्तालय परीमंडळ १ ते ५, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक १ व २, लोहमार्ग (महिला), गृहरक्षक दल, वनविभाग पुरुष व महिला, वाहतूक विभाग दुचाकीस्वार, डायल ११२ वाहन, वज्र वाहन दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक, वरुण वाहन दंगल नियंत्रण पथक, शासकीय रुग्णवाहिका १०८, बालभारती, अंमली पदार्थ शोधक श्वान पथक, अग्निशमन दल तसेच विविध शाळांच्या पथकांनी सहभाग घेतला होता.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध पुरस्कारांचे वाटप अजित पवार यांच्या हस्ते झाले. भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा- २०२२-२३ अंतर्गत विजेत्या गावांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हास्तरावर बारामती तालुक्यातील काऱ्हाटी या गावाला प्रथम, पुरंदर तालुक्यातील सोनोरी आणि चांबळी या गावांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देण्यात आले. त्याशिवाय एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात स्मार्टफोनचे वाटप करण्यात आले.