लोणी काळभोर (पुणे): दरोडेखोरांना अथवा चोरट्यांना मोठ्या शिताफिने व जिवावर उदार होऊन पकडणाऱ्या पोलिसानींच स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच पोलिस ठाण्यात दरोडा होय, शब्दश: दरोडाच टाकल्याचा धक्कादायक प्रकार शहर पोलिस दलाअंतर्गत असलेल्या लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील उरुळी कांचन पोलिस चौकीचे रुपांतर स्वतंत्र पोलिस ठाण्यात झाल्याची घोषणा शासनाकडून झाल्यानंतर, लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एका मुद्देमाल कारकूनासह त्याच्या चार पोलिस सहकाऱ्यांनी यापुर्वी पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलीली दहापेक्षा अधिक मोटारसायकलींची खुल्या बाजारात विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पोलिस कायद्याप्रमाणे पाच अथवा पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी छोटी अथवा मोठी चोरी केल्यास, संबधितांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला जातो. याही प्रकरणात आत्तापर्यंत झालेल्या प्राथमिक चौकशीत पाच पोलिसांनी दहापेक्षा अधिक वाहनांची चोर बाजारात विक्री केल्याची माहिती पुढे आल्याने, या प्रकरणात वरील पाच जणांवर कोणता गुन्हा दाखल होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यातील एका मुद्देमाल कारकूनासह त्याच्या चार पोलिस सहकाऱ्यांनी मागील काही महिन्यांत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या काही मोटारसायकलींची खुल्या बाजारात विल्हेवाट लावल्याच्या घटनेस दुजोरा दिला आहे. या प्रकरणाची मागील दोन दिवसांपासून सखोल चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच वरील पाच जणांनी नेमक्या किती मोटारसायकली विकल्या आहेत, याचा अंदाज येणार आहे. या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना दिली असून त्यांच्या आदेशानुसार पुढील काही तासांत प्रत्यक्ष गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती शशिकांत चव्हाण यांनी “पुणे प्राईम न्यूज” ला दिली.
“पुणे प्राईम न्यूज”ला गोपनीय पोलिस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीत उरुळी कांचन पोलिस चौकी येत असल्याने, लोणी काळभोर पोलिसांनी विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने उरुळी कांचन चौकीच्या आवारात ठेवली जात. लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या अखत्यारीतील उरुळी कांचन पोलिस चौकीचे रुपांतर नुकतेच स्वतंत्र उरुळी कांचन पोलिस ठाण्यात झालेले आहे. एक महिन्यापूर्वी याबाबतची घोषणा पोलिस खात्याकडून झाल्यानंतर लोणी काळभोर पोलिसांनी उरुळी कांचन पोलिस चौकीच्या आवारातील सर्व वाहने लोणी काळभोर येथील एका शासकीय जागेत आणून ठेवण्यासाठी, वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी पोलिस ठाण्यातील मुद्देमाल कारकूनासह त्याच्या चार पोलिस सहकाऱ्यांवर वरील कामगिरी सोपवली होती. ही कामगिरी पार पाडताना ज्या दुचाकी वाहनांचा “वाली” (मालक) मिळालेला नाही, अशी अनेक वाहने वरील पाच जणांनी परस्पर खुल्या बाजारात विकल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी नेमक्या किती मुद्देमाल मोटारसायकलींची परस्पर विल्हेवाट चालली याचा आकडा अद्याप जाहीर केला नसला तरी, तो आकडा किमान तीस ते पस्तीस असल्याची चर्चा उरुळी कांचन व लोणी काळभोर पोलिसांमध्ये सुरु आहे. एका खबऱ्याने वरील प्रकरणाची माहिती पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना देताच चक्रे फिरली आणि या प्रकरणाची चौकशी सुरु झाली. वरील पाच जणांनी किती गोंधळ घातला आहे, याची सखोल माहिती काही दिवसांत पुढे येणार आहे. मात्र, या प्रकरणामुळे लोणी काळभोर पोलिसांसह पुणे शहर पोलिस दलावरही मोठी नामुष्की ओढावली आहे. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी अथवा वरीष्ठ अधिकाऱ्यांनी तोंड उघडले नसले तरी, शहर पोलिसांच्या कामाची पध्दत पाहता या गुन्ह्याची पाळेमुळे खणली जाणार हे निश्चित आहे.
याबाबत “पुणे प्राईम न्यूज”ला अधिक माहिती देताना वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण म्हणाले, घडलेली घटना खरी आहे.जप्त केलेल्या अथवा अपघातातील वाहनांची माहिती गोळा करत आहेत. पुढील काही तासांत वरील माहिती गोळा झाल्यानंतरच मुद्देमाल कारकूनासह त्याच्या चार पोलिस सहकाऱ्यांनी नेमक्या किती मोटारसायकलींची परस्पर विल्हेवाट लावली, याचा आकडा आम्हालाही कळणार आहे. मात्र, प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, पुढील काही तासांत वरीष्ठांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर मलिन होणार असली तरी, या प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही, अशा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे.