चंदीगड: विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीला एकाच दिवसात दोन झटके लागले आहेत. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आणखी एका पक्षाने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. निवडणुकीआधीच मोठी फूट पडली आहे.
पंजाबमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमधील सर्व 13 लोकसभा जागांवर आम आदमी पक्ष स्वबळावर लढवणार असल्याचे सांगितले आहे. राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि आप यांच्यात युती झाली आहे. याशिवाय गुजरात आणि दिल्लीतील जागांवरही एकमत झाले आहे. पंजाबमध्ये आपचे प्रचंड बहुमत असलेले सरकार आहे. अशा स्थितीत लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यावर एकमत होत नाही, असंही मान यांनी सांगितले.
‘आप’ने सुरू केली तयारी:
पंजाबमधील ‘आप’नेही राज्यातील सर्व लोकसभा जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सर्व 13 जागांवर निवडणूक लढवण्याचे वक्तव्य केले होते. पंजाबबाबत काँग्रेस आणि दिल्लीतील आप हायकमांडमध्ये एकमत होऊ शकले नाही, अशा वेळी हे विधान समोर आले आहे.
पंजाब काँग्रेसलाही फारसा रस नाही:
पंजाब काँग्रेसलाही आपसोबतच्या युतीबाबत फारसा नाही. पक्षाने चंदीगड येथील पंजाब काँग्रेस भवनात एक वॉर रूम आणि राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी राज्यभरातील बूथ स्तरापर्यंतच्या नेत्यांशी थेट समन्वय साधून विभागीय निवडणुकीची रणनीती तयार करेल.
यापूर्वी, प्रदेश काँग्रेसने 13 मतदारसंघात लोकसभा समन्वयक नेमले आहेत, ज्यांच्याकडे लोकसभा मतदारसंघ स्तरावर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पंजाब काँग्रेसच्या नव्याने स्थापन झालेल्या वॉर रूममध्ये पक्षाने निवृत्त आयएफएस अधिकारी एचएस किंगरा, राजवंत राय शर्मा, युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमन स्लॅच, कुलजीत सिंग बेदी आणि जंगप्रीत सिंग यांची नियुक्ती केली आहे. वॉर रूमच्या डिजिटलायझेशनचे कामही सुरू करण्यात आले असून, त्याअंतर्गत डेटा इंटेलिजन्स युनिट, पॉलिटिकल इंटेलिजन्स युनिट, ग्राउंड कॅम्पेन टीम, फील्ड मॅनेजमेंट टीम, सोशल मीडिया मॅनेजमेंट टीम्स तयार करण्यात येणार आहेत.