मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. शिवसेनाप्रमाणेच राष्ट्रवादी कोणाची? याबाबतच प्रकरण निवडणूक आयोगात आणि सुप्रीम कोर्टात सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरही हे प्रकरण सध्या सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यामध्ये त्यांनी थेट शरद पवार यांच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं आहे. शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे, असा उल्लेख त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केला आहे. अजित पवार गटाकडून शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे पत्रिज्ञापत्र सादर करण्यात आले.
शरद पवार हे हुकूमशहा पद्धतीने पक्ष चालवायचे. ते कुठल्याही नेत्याचा ऐकत नव्हते, फक्त काही मोजक्या लोकांचं ऐकायचे, असा उल्लेख सुनील तटकरे यांच्या प्रतिज्ञापत्रात आहे. शरद पवार यांनी पक्षाची घटना पायदळी तुडवली, असा आरोप केला आहे. तटकरे यांच्या प्रतिज्ञापत्राने वाद होण्याची शक्यता आहे.
फेरसाक्ष नोंदवण्यात येणार
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांकडे सुनावणी सुरु होणार आहे. या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. यावेळी अजित पवार गटाकडून छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष नोंदवण्यात येणार आहे. तसेच शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे. दरम्यान 20 ते 25 जानेवारी दरम्यान फेरसाक्ष नोंदवण्यात येण्याची शक्यता आहे