लोणी काळभोर : लोणी काळभोरसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी दुचाकी चोरून धुमाकूळ घालणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना यवत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून १० गुन्ह्यांची उकल करून तब्बल साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
कृष्णा रामभाऊ लोंढे (वय २३, रा.नानगाव रासकर आळी ता.दौंड, जि.पुणे) व राहुल उर्फ कोयत्या हिंम्मत पवार (वय २१, रा.नानगाव ता दौंड जि पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नानगाव व पाटस (ता.दौंड जि. पुणे) येथून मोटार सायकल चोरी झाली होती. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सदर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना गुन्हे शोध पथकाला दिल्या होत्या.
यवत गुन्हे शोध पथक सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना, पाटस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता, पोलिसांना सदरचा गुन्हा कृष्णा रामभाऊ लोंढे व त्याच्या इतर दोन साथीदारांनी केला आहे. तसेच संशयित चोरटे नानगाव चौक येथे असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून कृष्णा लोंढे व राहुल उर्फ कोयत्या पवार याला ताब्यात घेतले.
दरम्यान, दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, आरोपींनी त्यांचा अजून एक साथीदार यश उर्फ पंडीत ज्ञानेश्वर थोरात (रा. नानगाव ता.दौंड, जि.पुणे) यांच्या मदतीने दुचाकी चोरी केल्याच्या कबुली पोलिसांना दिली आहे. यवत पोलिसांनी आरोपींकडून यवत,दौंड , लोणी काळभोर, हडपसर, बारामती शहर हद्दीतून १० मोटार सायकली चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. तसेच त्यांच्याकडून ९ मोटार सायकली असा एकूण ३ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींचा साथीदार यश उर्फ पंडीत थोरात हा फरार झाला असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख,पोलीस हवालदार निलेश कदम,गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव,महेंद्र चांदणे, रामदास जगताप, हनुमंत भगत व समीर भालेराव
यांच्या पथकाने केली आहे.