पुणे : करोनाकाळात मंदावलेल्या अवयवदान प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. राज्यात पुणे विभागाने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात गेल्या वर्षी १४८ जणांनी मरणोत्तर अवयवदान केले होते. त्यापैकी सर्वाधिक अवयवदान पुणे विभागात नोंदवले गेले. ५८ जणांनी पुणे विभागात अवयवदान केले आहे. त्यामुळे १५८ रुग्णांना अवयव प्राप्त झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगरात सर्वात कमी
चांगलीबाब म्हणजे पुणे विभागात गेल्या तीन वर्षांपासून मरणोत्तर अवयवदानात वाढ होत असल्याचे निरीक्षणस आले आहे. तर, अवयवदानात दुसऱ्या क्रमांकावर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे, आणि तिसऱ्या स्थानी नागपूर विभाग आहे. सर्वांत कमी अवयवदान छत्रपती संभाजीनगर विभागात झाले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये अवयव प्राप्त होण्यासाठीच्या प्रतीक्षा यादीमध्ये वाढ होत आहे. गरजेच्या तुलनेत अवयव उपलब्ध होत नसल्याने सर्वच स्तरांतून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
किडनी, हृदयाची प्रतीक्षा
सद्यस्थितीत पुणे विभागातील १६३० रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत आहेत. हृदयाच्या प्रतीक्षेत ४५ रुग्ण आहेत. हृदय प्रत्यारोपणाची सुविधा सर्वच रुग्णालयांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे हृदय प्रत्यारोपण होण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे. पुणे विभागात गेल्या तीन वर्षांत हृदय प्रत्यारोपणाच्या १३ शस्त्रक्रिया झाल्या आहेत.
पुणे विभागात २०२१मध्ये ४४ मृत रुग्णांचे अवयवदान झाले. त्यातून ९७ रुग्णांना विविध अवयव प्राप्त झाले. सन २०२२मध्ये ४६ मृत रुग्णांच्या अवयवदानातून ११८ रुग्णांना जीवनदान मिळाले. गेल्या वर्षी, २०२३ मध्ये ५८ जणांच्या अवयवदानातून १५८ रुग्णांना अवयव प्राप्त झाल्याची माहिती पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने दिली.
विभागांतील अवयवदान
पुण्यात ५८, मुंबईत ४९, नागपूरात ३५, छत्रपती संभाजीनगरात ६ जणांचे अवयव दान करण्यात आले.