पुणे: ग्रीन हायड्रोजन सारखे जैविक इंधन ही काळाची गरज बनली आहे. भविष्यात साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच पर्यायी जैविक इंधन निर्मितीवर भर द्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केले. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित तिसऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष शरद पवार या वेळी उपस्थित होते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष आदित्य झानुझुनवाला, राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील हे देखील या वेळी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, एका बाजूला कृषी उत्पादनांच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण झाला असून अनेक कृषी उत्पादने मागणीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे त्यांना पुरेसा भाव मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांना त्यासाठी स्वतंत्र अनुदान द्यावे लागते, तर दुसऱ्या बाजूला आपण सुमारे ८० टक्के पारंपरिक इंधन आयात करतो. आपल्या देशातील साखर उद्योग हा पूर्णपणे ब्राझीलसारख्या देशावर अवलंबून असल्याने भविष्याचा विचार करता केवळ साखर उत्पादनावर अवलंबून राहणे देशाला परवडणारे नाही. म्हणूनच साखर उद्योगाने आता साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनाच्या निर्मितीवर अधिक भर देण्याची गरज आहे, असंही गडकरी म्हटले.