पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशातच पार्थ पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अजित पवार यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांच्या विरोधात पार्थ निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर पार्थ पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत हडपसर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी बैठका घेतल्याने ते शिरूरमधून निवडणूक लढविणार, या चर्चेने जोर आणखी धरला आहे. त्यामुळे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याविरोधात नेमका उमेदवार कोण असेल, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मावळ आणि शिरूर हे दोन लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहेत. यातील मावळ मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार असून शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार यांच्या गटासोबत राहिले आहेत. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना निवडणुकीत पाडण्याचे जाहीर आव्हान दिले होते. शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे पर्यायी आणि सक्षम उमेदवार आहेत, असं अजित पवार म्हणाले होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही आमचाच उमेदवार निवडून आणणार, असे अजित पवार यांनी सांगिल्यानंतर कोल्हे यांनीही मैदान मारण्याची भाषा केली. त्यानंतर माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पवार गटात प्रवेश करणार, अशी जोरदार चर्च होती. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच त्यांचे पुत्र पार्थही शिरूर लोकसभा मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. त्यामुळेच पार्थ यांना शिरूरमधून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेकडे विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली असून त्याअंतर्गत येत असलेल्या मतदारसंघात बैठका आणि दौरे सुरू केले आहेत. त्यापाठोपाठ पार्थ पवार यांनीही हडपसर भागातील राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. पार्थ यांनी मंगळवारी हडपसर विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला असून या भागातील अजित पवार समर्थक माजी नगरसेवकांशी त्यांनी चर्चा केली. या दरम्यान काही नगरसेवकांच्या जनसंपर्क कार्यालयालाही त्यांनी भेट दिली. त्यामुळे ते शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे.