मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रानौत ही नेहमीच चर्चेत असते. आता ती बिल्किस बानो यांच्यावर आधारित चित्रपटाबद्दल विचारलेल्या प्रश्नामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. कंगना रनौतला एका नेटकऱ्यांनं नुकतच बिल्किस बानो यांच्यावर आधारित चित्रपट करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
एक्सवर एका नेटकऱ्यानं कंगनाला प्रश्न विचारला की, “प्रिय कंगना मॅम, महिला सक्षमीकरणाबाबत तुमची तळमळ खूप उत्साहवर्धक असते. तुम्ही बिल्किस बानो यांची कथा चित्रपटाच्या माध्यमातून सांगू शकता का?” नेटकऱ्याच्या या प्रश्नाचं कंगनानं उत्तर दिलं आहे.
कंगनाच्या उत्तरानं वेधलं लक्ष
नेटकऱ्याच्या प्रश्नाला कंगना उत्तर देत म्हणतेय की, “मला ती कथा बनवायची आहे, माझ्याकडे स्क्रिप्ट देखील तयार आहे, मी त्यावर तीन वर्षे काम केले आहे. पण नेटफ्लिक्स, अॅमेझॉन इन आणि इतर स्टुडिओने मला पत्र लिहिले की, त्यांची मार्गदर्शक तत्त्वे अशी आहेत की, ते तथाकथित राजकीय हेतूने प्रेरित चित्रपट बनवत नाहीत. जिओ सिनेमाने म्हटले आहे की, आम्ही कंगनासोबत काम करत नाही कारण ती भाजपला पाठिंबा देते आणि जिओ विलीनीकरणातून जात आहे. आता माझ्याकडे काय पर्याय आहेत?” कंगनाच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
3 मार्च 2002 रोजी गुजरातमध्ये दंगली झाल्या. त्यावेळी 21 वर्षीय बिल्किस यांच्या कुटुंबात 15 सदस्य होते. बिल्किस यांच्या कुटुंबावर 20-30 जणांनी शस्त्र घेऊन हल्ला चढवला. त्यांनी बिल्किस बानो, त्यांची आई आणि कुटुंबातील इतर तीन महिलांवर बलात्कार केला. 12 सदस्यची हत्या केली. ही घटना घडली त्यावेळी बिल्किस बानो पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या.